Sunday, 16 July 2017

Flowers: Spreading Caper | Pachunda (पाचुंदा) | Capparis divaricata Lam.

पावसाळ्याच्या सुरवातीला हळू हळू धरतीचा रंग बदलत जातो, लाल भुरकी माती आपल्या नकळत गवतामुळे कधी हिरवी गार होते ते कळत नाही. या पंधरा दिवसात बऱ्याच घडामोडी घडत असतात. फुलपाखरांचे सुरवंट हिरव्या गवतांवर आणि छोट्या झुडपांवर ताव मारताना दिसायला लागतात, काही फुलपाखरं आजूबाजूला बागडायला लागतात, पक्षांची घरटी बांधून होत आलेली असतात, ठिकठिकाणी मुंग्यांची लगबग सुरु असते, संपूर्ण सजीव सृष्टीला एक नवचैतन्य मिळालेलं असतं. प्रत्येकजण पावसामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी तयारीला लागलेला असतो. पावसाळ्याची सुरवात म्हणजे नवनव्या वनस्पतींचा रुजण्याची योग्य वेळ. पण रुजण्यासाठी लागणाऱ्या बिया येणार कुठून आणि त्यांची पाखरण होणार कशी? वृक्षांचा फुलण्याचा काळ म्हणजे उन्हाळा. पुढे पावसाच्या तोंडावर वृक्षांवर लागलेली फळं बऱ्यापैकी पिकून लाल, पिवळी नारंगी वैगेरे झालेली असतात. ही फळ उन्हाच्या तडाख्याने आणि कधी कधी पावसाच्या आणि वाऱ्याच्या माऱ्याने तुटून खाली पडतात. कधी पावसाच्या पाण्यासोबत तर कधी वाऱ्यावर स्वार होऊन इकडे तिकडे पसरतात आणि रुजतात.

पाचुंदा हे असंच एक झुडूपवजा छोटं झाड! पावसाळ्याच्या तोंडावर फळं पिकायला लागतात, काही दिवसात अगदी लालबुंद होतात आणि फुटतात. एव्हाना एक दोन पाऊस पडून गेल्याने जमिनीत बऱ्यापैकी ओलावा आलेला असतो. अशात फुटलेल्या फळांतील बिया खाली पडतात आणि दोन चार दिवसांतच रुजतात देखील.

पाचुंदा हे आपलं भारतीय झुडूप आहे, कमी पाण्याची कुरकुर न करता सहज निभावून नेणार! खरं तर वृक्षलागवडींसाठी अशा झाडांचा विचार होणं गरजेचं आहे. याच्या बिया गोळा करून पावसाआधी योग्य ठिकाणी टाकल्या तरी त्या लगेच रुजतात आणि कमी पाण्यात किंवा पाण्याविना वर्षभर तग धरून राहतात, शिवाय देशी झाड असल्याने इतर प्राणी व पक्षांना यांच्या वाढण्याचा काही त्रास होत नाही. उलट पक्षी, प्राणी, कीटक या वृक्षाचा आसरा घेतात.

असो, पाचुंदा हा साधारणपणे  १० ते १५ फूट उंचीपर्यंत वाढतो, तर कधीकधी तो जेमतेम पाच ते सहा फुटांपर्यंतच वाढतो. पाचुंद्याची वाढ ही अतिशय संथ गतीने होते. झुडूप असल्यास अगदी जमिनीपासून फांद्या लागलेल्या दिसतात पण तेच जर वृक्ष असेल तर साधारण पाच-सात फुटांच्या वरती फांद्यांचा विस्तार पाहायला मिळतो. फांद्यांची रचना खूप गुंतागुंतीची असते, म्हणजे इतकी की झाडाच्या विस्तारापलीकडे कुणी उभं असेल तर ते देखील दिसणार नाही.  पाचुंद्याचं खोड मोठं विशेष, याचं बाहेरचं आवरण खूप खरबरीत असते. सालीवर चिरा गेल्यासारख्या त्या भासतात आणि त्यामुळे साल खरबरीत लागते. या वृक्षाची पाने साधारणपणे २ ते ५ सेमी लांबीची आणि १.५ ते २ सेमी रुंदीची असतात. पानांचा आकार मधल्या भागात रुंद आणि मग दोन्ही टोकांकडे तो निमुळता होत जाताना दिसतो. पानांचा रंग बहुधा गर्द किंवा काळपट हिरवा असतो. देठ एखादं सेमीचा असेल, आणि पानाच्या कडा एकसंध असतात. पानांचा अग्रभाग टोकदार असतो, अगदी भाल्याचं टोक शोभावं असं. पाचुंद्याचं आणखी एक वैशिष्ठ म्हणजे याच्या संबंध फांद्यांवर काटे असतात. फांद्यांच्या टोकाकडच्या भागातील काटे बहुधा सरळ, कडक, पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाचे आणि महत्वाचं म्हणजे अतिशय तीक्ष्ण असतात. याउलट फांद्यांच्या बाकी भागातील काटे आकाराने लहान आणि हुकाप्रमाणे उलटे फिरलेले असतात. हे देखील तीक्ष्ण, लालसर किंवा तपकिरी रंगाचे असतात. झाडावर असलेले काटे महत्वाची म्हणजेच संरक्षणाची जबाबदारी पार पडतात. आधी सांगितल्याप्रमाणे पाचुंदा कमी पाण्यात सुद्धा वाढणारा वृक्ष आहे. पर्यायाने पानांची संख्या, आकार, खोडातील विविधता या सर्व गोष्टी पाण्याच्या असणाऱ्या अभावाशी दोन हात करणाऱ्या असतात. काही काळासाठी पाणी नाही मिळालं तरी झाडाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये साठवलेलं पाणी अगदी काटकसरीने वापरलं जातं. पानं प्रकाशसंश्लेषणाची म्हणजेच अन्न तयार करण्याची मुख्य जबाबदारी बजावतात म्हणून त्यांना संरक्षण हवं आणि हीच महत्वाची जबाबदारी काटे पार पडतात. यानंतर जेव्हा फुलं लागतात त्यांचही संरक्षण हे काटे करतात. माळरानांवर भटकी जनावरं फिरत असतात, पण बहुधा पाचुंद्याची पानं खाताना जनावरं दिसत नाहीत ती या काट्यांच्या भीतीनेच.

फेब्रुवारी ते मार्च दरम्यान, म्हणजेच भर उन्हाळ्यात पाचुंदा फुलू लागतो, पाहता पाहता संपूर्ण वृक्षावर आणि झुडपावर फुलं फुलतात. एरवी काटेरी वाटणारा पाचुंदा आकर्षक आणि टपोऱ्या फुलांमुळे आता भलताच लोभसवाणा वाटू लागतो. ही फुलं दीड ते अडीच सेमी लांबीच्या देठांवर लागतात. फुलांचा व्यास ४-६ सेमी असतो, पाकळ्या फिक्कट पिवळ्या रंगाच्या किंवा काहीशा हिरवट रंगाच्या असतात. पाकळ्यांच्या खाली हिरव्या किंवा फिक्कट पिवळ्या रंगाची संरक्षण दले असतात, या दलांची खालची बाजू मुलायम केसांनी भरलेली असते. फुलांच्या मधोमध स्रिकेसर आणि पुंकेसरांची जोडणी असते, स्रिकेसर एक तर पुंकेसर खूप सारे असतात. सुरवातीला स्रिकेसराचा दांडा पिवळ्या किंवा हिरवट पिवळ्या रंगांचा असतो, पण जस-जसं फुल परिपक्व होत जात तसा हा दांडा केसरी रंगाचा होत जातो. केसरी रंग खालच्या बाजूने टोकाकडे वाढत जातो. फुल परिपक्व झालं की पुंकेसराची खालची बाजू देखील केसरी रंगाची होऊ लागते. या आकर्षक रंगाने फुलाचा मध्यभाग केसरी आणि उरलेला भाग फीक्कट पिवळा किंवा हिरवट पिवळा दिसतो. या रंगसंगतीमुळे फुलं खूप आकर्षक दिसू लागतात.

या रंगांना भुलून कीटक विशेषतः मुंगळे, पक्षी, फुलपाखरं वैगेरे मकरंद गोळा करण्यासाठी फुलांना भेटी देतात. या प्रक्रियेतून परागकणांची देवाण-घेवाण होते आणि फळधारणा होते. सुरवातीला फळे आकाराने लहान म्हणजे एखादं सेमी व्यासाची असतात, दांडा आणि फळ एकत्र पाहिलं तर मारूतिरायांच्या गदेची प्रतिकृती वाटावी अशी भासतात. फळांवर उभ्या तीन-पाच रेषा असतात. पुढे फळांचा आकार साधारणपणे पेरूच्या आकाराचा होतो. फळे गोल असून पिकल्यावर केशरी किंवा लालबुंद होतात. मुंगळे फळांवरील रेषांच्या जागी हळूहळू चावून चावून फळं फोडण्यास मदत करतात. एकदा का फळं फिटली की आतमधील गर आणि त्यातील बिया बाहेर पडतात आणि रुजण्यासाठी तयार असतात. फळांमधील गर पिवळसर पांढऱ्या रंगाचा असून काहीसा चिकट असतो.


बिया अर्धा ते एक सेमी व्यासाच्या असून साल काढल्यानंतर मानवी गर्भाशयाच्या रचनेशी साम्य असणाऱ्या असतात. बीयांचं बाह्य आवरण चंदेरी असतं. वर सांगितल्याप्रमाणे बिया योग्य वातावरण मिळाल्यास आठवड्यात रुजतात.

पाचुंद्याला इंग्रजीमध्ये स्प्रेडींग कॅपर (Spreading Caper) असं नाव आहे. शास्रिय भाषेत याला Capparis divaricata अशा नावाने ओळखतात. पाचुंद्याचा समावेश Capparaceae (कॅपेरॅसी) या कुळामध्ये झाला आहे. या कुळातील सर्वच वनस्पतींची फुले पाचुंद्यासारखी सुंदर असतात, काही यापेक्षाही सुंदर आहेत. पाचुंदा हा वृक्षलागवडीच्या कार्यक्रमांत महत्वाचा ठरू शकतो. बिया अगदी सहज रुजतात, रोपं कमी पाण्यात सुद्धा तग धरून राहतात आणि वाढतात. शेवटी स्थानिक वनस्पती जगणं हे निसर्गाच्या दृष्टीने महत्वाचं आहे.

Plant Profile:

Botanical Name: Capparis divaricata Lam.
Synonyms: No Synonyms
Common Name: Spreading Caper
Marathi Name: पाचुंदा
Family: Capparaceae
Habit: Tree or Shrub
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, and planes (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Greenish yellow (हिरवट पिवळा)
Leaves: Simple, 3-6 cm long, elliptic or linear.
Smell: Fragrant
Abundance: Common
Locality: Dattagad, Dighi, Pune
Flowering Season: Feb-Mar
Date Captured: 25-Apr-2017

-          राजकुमार डोंगरे

Saturday, 6 May 2017

Flowers: Medhshingi | Medhshingi (मेढशिंगी), Bhedshingi (भेडशिंगी)| Dolichandrone falcata (Wall. ex DC.) Seem.

Flowering twig
मेढशिंगी! उन्हाळ्यात फुलणारं एक सुंदर आणि सुगंधी फुल. उन्हाळ्याच्या दिवसांत भर दुपारी उघड्या बोडक्या माळरानावरून चालताना अशी रानफुलं रस्त्यात भेटतात. त्यांचा सुगंध, सौंदर्य आपल्याला भुरळ घालतं, थकवा आणि उन्हाची तीव्रता घालवतं. मेढशिंगी उन्हाळ्यातील एक मुख्य फुल, महाराष्ट्रापासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे कमी अधिक फरकाने हा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. यांचा मुख्य आदिवास म्हणजे 'भारत', ही फुलं इथली प्रदेशनिष्ठ आहेत.


मेढशिंगीला आणखी एक नाव आहे भेडशिंगी. दोन्ही नावांमध्ये 'शिंगी' या शब्दाची पुनरावृत्ती दिसते, त्याचं कारण या वृक्षाच्या शेंगा आहेत. या शेंगांचा आकार  मेंढीच्या शिंगांसारखा अर्धगोलाकार असून त्यावर आडव्या रेषा असल्याचा भास होतो आणि म्हणून त्या अर्थाने दोन्ही नावात 'शिंगी' शब्दाचा उल्लेख दिसतो. मेढशिंगी हा वृक्ष साधारणपणे १० ते २० फुटांपर्यंत वाढतो. उघडी बोडकी माळरानं, पानगळीची व शुष्क वनं आणि हलका डोंगर उतार असणाऱ्या जागांवर हा छान वाढतो. मेढशिंगी खूप कमी वेगाने वाढणारं झाड आहे, त्याच्यामध्ये कमी पाण्याच्या ठिकाणी तग धरून राहण्याची क्षमता आहे त्यामुळे त्याला पाणी थोडंसं कमी असलं तरी फारसं बिघडत नाही. विशेष म्हणजे चांगला पोत असणाऱ्या जमिनीत याची लागवड केली तरी फारशी विशेष वाढ याची होताना दिसत नाही, कारण नैसर्गिकरित्या तो खूप हळू वाढणारा वृक्ष आहे.

Habit (Entire Tree)

मेढशिंगीचे खोड टणक आणि मजबूत असते. खोडावरील आणि मुख्य फांद्यांवरील साल बहुधा खपल्या निघालेली आणि खरबरीत असते, रंग राखाडी असतो. मेढशिंगी बहुधा सरळ वाढते आणि फांद्यांचा पसारा कमी असल्याने झाडाचे खोड जास्त जाड होत नाही. मुख्य फांद्या सुद्धा खोडाप्रमाणे टणक असतात. मेढशिंगीची पाने संयुक्त प्रकारात मोडतात, म्हणजे ५ ते ६ पर्णिका मिळून एक पान तयार होते. सर्व पर्णिका मुख्य अक्षावर जोडलेल्या असतात. प्रत्येक पर्णिका ही साधारणपणे ३-६ सेमी लांबीची असते. पर्णिकांचा आकार हा अंडाकृती किंवा गोलाकार असतो. टोकाकडे पर्णिका क्वचितच टोकदार असतात. संपूर्ण पान ४-६ इंच लांबीचे असून पानांचा देठ २ सेमी लांबीचा असतो. नवीन फांद्यांच्या टोकाला २-३ फुलांचे फुलोरे लागतात. प्रत्येक फुल ५-७ सेमी लांबीचे आणि साधारण ३ सेमी व्यासाचे असते. फुल समोरच्या बाजूने पाहिल्यास पिपाणी सारखा त्याचा आकार दिसतो. फुलाच्या खालच्या भागात एक संरक्षणदल असते, त्याचा रंग पोपटी असून लांबी २-सेमी पर्यंत असते. फुलाची खालची बाजू हे संरक्षणदल वेढून घेतं आणि फुलाला संरक्षण देतं. टोकाकडे हे संरक्षणदल पाकळीसारखं भासतं आणि ते फुलाच्या नळीपासून थोडंसं गेलेलं असतं. संरक्षणदलाच्या टोकापासून पाकळ्या बाहेरील बाजूला वक्राकार वळतात. खालच्या बाजूला एकमेकांना जोडलेल्या पाकळ्या टोकाकडे वेगळ्या होतात. पाकळ्या पांढऱ्या शुभ्र असून बाहेरील बाजू झालरीसारखी दिसते. स्त्रीकेसर आणि पुंकेसर फुलाच्या पोकळ नळीमध्ये असतात.


मे महिन्यात फुलांची वाढ पूर्ण झाली की चमकदार पांढरा रंग, झालरीसारख्या पाकळ्या आणि मनमोहक सुगंध याच्या जोरावर पक्षी, फुलपाखरं, मधमाश्या, भुंगे, मुंगळे वैगेरे वृक्षाकडे आकर्षित होऊ लागतात. पक्षांमध्ये सूर्यपक्षी विशेष हजेरी लावतात, आपल्या लांब आणि वक्र चोचीने फुलातील मकरंद चाखतात. या सर्वांमुळे प्रजननाची प्रक्रिया पार पडते आणि फळधारणा होते. मेढशिंगीच्या शेंगा साधारणपणे २-३ फुटांपर्यंत वाढतात. शेंगा परिपक्व होताना वर सांगितल्याप्रमाणे मेंढीच्या शिंगांसारख्या वक्र होतात आणि त्यांचा रंग बदलून खाकी किंवा सौम्य चॉकलेटी होतो. उन्हाच्या चटक्याने शेंगा फुटतात आणि बिया जमिनीवर विखुरतात. बियांचा आकार साधारणपणे १-१.५ सेमिचा असतो. बिया चपट्या आणि आयताकृती असून दोन्ही बाजूने त्यांना लांब पंख असतात. हवेच्या जोरावर आणि पंखांच्या साहाय्याने या बिया आजूबाजूच्या परिसरात पसरतात. पावसाळ्यानंतर योग्य वातावरण मिळालं कि रुजतात.मेढशिंगी हा भारतीय वृक्ष असूनही त्यावर विशेष संशोधन झालेलं नाही, आयुर्वेदामध्ये पोटदुखी आणि अनावश्यक गर्भधारणा यावर उपाय म्हणून मेढशिंगी वापरल्याचे दाखले आहेत परंतु नव्या युगाचं विशेष असं संशोधन झालेलं दिसत नाही. काही निवडक संशोधनातून त्याच्यातील रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास झाला आहे आणि त्यातील निष्कर्षाप्रमाणे मेढशिंगीमध्ये 'ई' जीवनसत्व आढळलं आहे. मेढशिंगी हा खूप सावली देणारा वृक्ष नसला तरी कमी पावसाच्या आणि कमी पाण्याच्या परिसरात लागवडीसाठी उपयुक्त आहे. त्याचं लाकूड टणक आणि सरळ असल्याने घरबांधणी मध्ये त्याचा वापर होऊ शकतो.
मेढशिंगीला हिंदीमध्ये हावर तर शास्त्रीय भाषेत Dolichandrone falcata (Wall. ex DC.) Seem. असं म्हणतात. या वृक्षाचा समावेश Bignoniaceae (बिग्नोनियेसी) या कुळात केलेला आहे.


Plant Profile:

Botanical Name: Dolichandrone falcata (Wall. ex DC.) Seem.
Synonyms: Bignonia falcata, Bignonia spathocea, Dolichandrone lawii, Spathodea falcata
Common Name: Medhshingi
Marathi Name: मेढशिंगी, भेडशिंगी
Family: Bignoniaceae
Habit: Tree
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, Grasslands (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: White (पांढरा)
Leaves: Compound, 4-6 inches long, leaflets elliptic, round or obovate, 2-3 cm long, 5-6 leaflets.
Smell: Fragrant
Abundance: Common
Locality: Dattagad, Dighi, Pune
Flowering Season: April-May
Date Captured: 12-Apr-2017


- रा.जा. डोंगरे

Wednesday, 12 April 2017

Flowers: Rubber bush, Apple of sodom, French cotton | Rui (रुई) /Mandar (मंदार) | Calotropis procera (Aiton) W.T. Aiton


Seeds (Achenes) coming out of fruits
मंदिराच्या बाहेर लागलेली रांग आणि समोर बसलेल्या विक्रेत्यांच्या टोपल्या पाहून मी भानावर आलो. एका विक्रेत्याच्या दोन्ही हातात रुईच्या पानांचे भरगच्च हार होते, खाली टोपलीत सुटी पानं व्यवस्थित ओळीने लावलेली होती. उन्हाने सुकू नये म्हणून त्यावर पाण्याचा शिडकाव केलेला. पानावरील एका टपोऱ्या थेंबात शेजारच्या आजीबाईच्या टोपलीचं प्रतिबिंब दिसत होतं.


सकाळपासून हनुमान जयंतीच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता. हनुमान चालीसा, मारूतिरायांची वेगवेगळी लोभसवाणी चित्र, त्याखाली वेगवेगळे दृष्टांत, महती, चमत्कार वैगेरेचे मेसेजेस असं बरंच काही वाचायला मिळत होतं. त्यात भर म्हणून काही लोकं अधूनमधून हनुमान चालीसाचे ऑडिओ पाठवत होते तर काहीजण बाल हनुमानची कार्टून्स पाठवत होते. दिवसभर वातावरण एकंदरीत भक्तिभावाचं होतं!


हे दृश्य तसं नवखं नाही, दर शनिवार भक्तांच्या अशाच रांगा बजरंगबलींच्या द्वारावर असतात, आपलं इच्छित पूर्ण करण्यासाठी! हिंदू संस्कृतीत बऱ्याचशा देवांना वेगवेगळी पानं-फुलं श्रद्धेने वाहिली जातात, जसं शंकराला बेलपत्र, गजाननाला दुर्वा आणि जास्वंदीची फुलं तसंच मारुतीरायाला रुईच्या पानांचा हार किंवा मोकळी पानं वाहिली जातात. किमान भारतात तरी रुई प्रत्येक माणसाला माहित असण्याचं कारण मारुतीरायच आहेत, याबद्दल दुमत असायचं कारण नाही. वर म्हटल्याप्रमाणे बऱ्याच देवांना आपण वेगवेगळी पानं-फुलं वाहतो, याचं काही सांस्कृतिक किंवा विशेष कारण असू शकेल का? म्हणजे, या देवांना अशी पानं-फुलं सतत वाहता यावी म्हणून तरी आपण वृक्ष संवर्धन करावं आणि पर्यायानं निसर्गसंवर्धन होईल, म्हणून ही अशी प्रथा रूढ झाली असावी का? अर्थात ही फक्त शक्यता आहे. ते काही असो, कुठल्या ना कुठल्या कारणाने संवर्धन होत आहे, हे महत्वाचं!

Flowers of Calotropis procera

रुई हे भारतीय झुडूप आहे, तसेच ते आशियातील इतर काही देशांचं देखील आहे. आफ्रिकेमध्ये सुद्धा रुई मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरित्या वाढते. रुईच्या दोन प्रजाती आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. त्यातील एक रुई आणि दुसरी अर्करुई अशा नावाने ओळखतात. वर-वर पाहता दोन्हीमंध्ये विशेष फरक नाही, जवळून आणि व्यवस्थित पाहिलं तर फुलांच्या पाकळ्यांमध्ये थोडासा फरक जाणवतो. दोन्ही प्रजाती सारख्याच प्रमाणात आपल्या भोवताली असल्याने, आपण दोन्हींना रुई म्हणूनच ओळखतो, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते खरं आहे.


रुईची झुडपे आपल्या लक्षात राहतात ती आणखी एका लहानपणच्या आठवणीसाठी, लहानपणी फळांतून निघणाऱ्या म्हाताऱ्या एक एक करून आपण उडवायचो. वाऱ्याच्या तालावर लयीत वर-खाली हेलकावे घेत त्या पुढच्या प्रवासाला जायच्या. काही क्षणांसाठी आपलं बालमन त्यांची सोबत करायचं, ती नजरेआड झाली की दुसरी म्हातारी फळातून काढायची आणि हवेत फुंकर मारून सोडायची. पायात काटा किंवा कुरूप झालं कि ग्रामीण भागात रुईचा चीक घातला जातो. पानं तोडून त्यातून निघालेला चीक जमा करायचा आणि त्यापासून चेंडू बनवायचा हा सुद्धा लहानपणचा एक महान उद्योग! तसं हे काम खूप कठीण असायचं कारण चेंडू बनवण्यासाठी खूप चीक लागायचा आणि मग लहानांची वानरसेना रुईच्या शोधार्थ रानात भटकत फिरायची. हल्ली तर पांढरी रुई घरासमोर लावली जाते, त्याने घरात लक्ष्मी येते असा भोळा (गैर?)समज आहे. या अशा एक ना अनेक कारणांनी रुई आपल्या लक्षात आहे, नकळत ती आता आपल्या जीवनातील एक महत्वाचं झुडूप बनून गेली आहे.

Fruits of Calotropis procera

नुकत्याच झालेल्या हनुमान जयंती निमित्त रुईची आपण माहिती घेऊ. रूई साधारणपणे १०-१२ फूट उंचीपर्यंत वाढू शकते, पण बहुधा ती ५-८ फुटांपर्यंत वाढलेली दिसते. जमिनीपासून साधारणपणे कधी कधी २-५ फांद्या निघतात तर कधी एकच खोड असते. रूईच खोड नवीन असताना हिरव्या रंगाचं आणि आतून पोकळ असतं, पुढे ते परिपक्व होतं आणि आतून भरीव होतं. परिपक्व झाल्यावर खोडाचा रंग पिवळसर पांढरा होतो साल खरबरीत होते, आणि त्यावर उभ्या रेषा पडतात. या उभ्या रेषांतून आतली हिरवी साल कधी कधी पुसटशी दिसते. रूईची पाने साध्या (Simple) प्रकारातील असतात, जोडणी एकमेकांच्या विरुद्ध असते. प्रत्येक पान साधारणपणे १२-१५सेमी लांबीचे असून रुंदी १० सेमी पर्यंत असते, आकार अंडाकृती असतो, देठाची बाजू हृदयाच्या आकाराची तर टोकाला अगदीच टोकदार असते, पानांच्या कडा एकसंध असतात, देठ नसतो त्यामुळं पानं काहीशी गर्दीने फांद्यांभोवती लागतात. पानं मांसल असून त्यांच्यावर चंदेरी किंवा पांढऱ्या रंगाची पावडर पडल्यासारखी भासतात. त्यामुळे पानांचा रंग भुरकट हिरवा होतो. बहुधा फांद्यांच्या टोकाला फुलोरे लागतात, प्रत्येक फुलोऱ्यात १०-१५ फुले लागतात. फुलांना मंद सुगंध असतो. फुलांचा दांडा साधारणपणे १-२ सेमी लांबीचा असतो तर व्यास १-२ सेमी असतो. पाकळ्यांची संख्या पाच असून त्या गुलाबी ते पांढऱ्या रंगाच्या असतात, अर्ध्यापासून टोकाकडे हा रंग गर्द गुलाबी किंवा जांभळा होतो. पाकळी टोकाकडून पाहिल्यास महिरपीसारखा आकार दिसतो. पाकळ्या जिथे जोडलेल्या असतात तिथून पाच पुंकेसर आणि एक स्रिकेसर निघतो. स्रिकेसराची जागा मधोमध असते आणि तो सर्व बाजूनी पुंकेसरांना जोडलेला व वेढलेला असतो. इतर बहुतांश वनस्पतींमध्ये पुंकेसरातून परागकण बाहेर पडतात, रुईमध्ये मात्र परागकण असणाऱ्या लहान-लहान पिशव्या बाहेर पडतात आणि मुख्य म्हणजे या पिशव्यांची वरची बाजू चिकट स्रावाने आच्छादलेली असते. चिकट स्रावामुळे परागीभवनाची प्रक्रिया सुलभ होते. या पिशव्यांना शास्त्रीय भाषेत 'पॉलिनीया' असं म्हणतात. पिशव्या आकाराने अतिशय लहान असल्याने उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाहीत. त्यासाठी मायक्रोस्कोप (सूक्ष्मदर्शी) लागतो. रुईच्या परागीभवनामध्ये महत्वाची भूमिका मुंग्या आणि मधमाशा बजावतात, अर्थात फुलपाखरे पक्षी हे सुद्धा या प्रक्रियेत सहभागी असतात परंतु त्यांचा सहभाग काहीसा कमी असतो. हे कीटक जेव्हा फुलांना भेटी देतात तेव्हा परागकण असणाऱ्या पिशव्यांची चिकट बाजू मधमाशीच्या किंवा इतर कीटकांच्या पायाला चिकटते. ज्यावेळी ते फुलावरून निघतात, तेव्हा या पिशव्या पुंकेसरापासून वेगळ्या होतात आणि मधमाशी किंवा किटकांच्या सोबत नवीन फुलाच्या शोधात निघतात. हे कीटक योगायोगाने योग्य फुलावर बसले तर पायांच्या हालचालीमुळे परागकणांच्या पिशव्या स्रिकेसरावर पडतात. एव्हाना स्रिकेसर सुद्धा ओला झालेला असतो आणि त्यामुळे प्रजननाचे पुढील सोपस्कार पूर्ण होतात.


प्रजननाच्या प्रक्रियेप्रमाणे साधारणपणे एका फुलोऱ्यात २-४ फळे लागतात, बाकी फुले फलित न झाल्याने सुकून जमिनीवर पडतात. फळांचा आकार करंजीसारखा असतो आणि लांबी ८-१२ सेमी पर्यंत असते. फळे सुरवातीला मांसल, हिरव्या रंगाची आणि गुबगुबीत असतात. हाताने हळूच दाबून पाहिल्यास आत हवा भरल्यासारखी भासते. जस जशी फळे परिपक्व होतात तशी त्यामध्ये बिया भरण्याची प्रक्रिया सुरु होते. बिया सुरवातीला पांढऱ्या रंगाच्या असतात आणि परिपक्व झाल्या कि गर्द खाकी किंवा विटकरी रंगाच्या होतात. आकार अंडाकृती आणि लांबी साधारणपणे २-३ मिमी असून त्या चपट्या असतात. फळांच्या आतल्या बाजूला ८-१० पदर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या खाचा असतात, या खाचांमध्ये बियांवरी मुलायम पांढरे केस ओळीने दाबून बसलेले असतात. अशा एका फळामध्ये खूप साऱ्या बिया दाटी-वाटीने परंतु व्यवस्थित बसलेल्या असतात, बाहेरून पाहिलं तर अगदी रांगोळीच्या ठिपक्यांसारख्या ओळीने बिया लागलेल्या असतात. फळं परिपक्व झाली की फुटतात आणि आतल्या खाचा ताणल्या जातात. परिणामस्वरूप केस असलेल्या बिया मोकळ्या होतात आणि हवेवर स्वार होऊन पुढच्या पिढीच्या तयारीसाठी निघून जातात. या म्हाताऱ्या फळांतून बाहेर पडताना पाहणं फार गमतीदार असतं. रुईला निसर्गाकडून हे वैशिष्ट्य लाभलं आहे, या म्हाताऱ्या बिया घेऊन  हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, योग्य ठिकाण मिळालं की रुजतात आणि चुकून नाही मिळालं तर मरून जातात.

Habit (Entire plant)

रुई आणि अर्करूई यातील फरक ओळखणं सोपं आहे. दोन्हींच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये थोडासा फरक असतो. रुईची पाने ही अर्करूई पेक्षा लहान असतात. त्याचप्रमाणे फुले देखील थोडी आकाराने लहान असतात. रुईची फुले चहाच्या कपाप्रमाणे उमलतात, क्वचित पाकळ्या देठाकडे वळतात, पाकळ्या महिरपीच्या आकाराच्या आणि अर्ध्यापासून टोकाकडे जांभळ्या किंवा गर्दगुलाबी असतात. याउलट अर्करूईची फुले आकाराने थोडी मोठी पाकळ्या संपूर्ण मागे देठाकडे वाळलेली असतात, फुलं परिपक्व झाली की पाकळ्यांची टोकं चक्राकार वळतात. संपूर्ण पाकळ्यांचा रंग जांभळा असतो, स्त्रीकेसर आणि पुंकेसर रुईच्या तुलनेत लांबीला जास्त असतात.


रूईची फुले दिसायला सुंदर असली तरी ती संपूर्ण झुडूप विषारी आहे, चुकून एखादा भाग अधिक प्रमाणात खाल्ला गेला तर मृत्यू ओढवू शकतो! या झुडपांचा कुठलाही भाग तोडला कि त्यातून चीक निघतो हा चीक विषारी आहे. चुकून तो डोळ्यांत गेल्यास दृष्टी कायमची जाण्याचा धोका असतो. हे सर्व धोके असले तरी काही औषधी गुणधर्म रुईमध्ये आहेत. कुष्ठरोगासारख्या दुर्धर आजारावर रुई गुणकारी मानली गेली आहे, त्याचप्रमाणे दम्यावर देखील ती चांगलं काम करते. या सर्व गोष्टींमुळे रूई जवळ काही करत असाल तर थोडंसं सावध राहावं!

Seed Dispersal of Rui


रूईला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. मराठीमध्ये हिला मंदार असही म्हणतात. हिंदीमध्ये आक, संस्कृतमध्ये आदित्यपुष्पिका किंवा क्षीरपर्ण, इंग्रजीमध्ये Rubber bush, Apple of sodom, French cotton अशी नावं आहेत. रुईचं शास्त्रीय नाव Calotropis procera (Aiton) W.T. Aiton असं आहे. यामध्ये Calotrpois हा शब्द वनस्पतीतुन निघणाऱ्या चिकातील Calotropin या रासायनिक पदार्थावरून आला आहे. रुई मिल्कवीड (Milkweed) म्हणजेच Apocynaceae या कुळातील आहे. Milkweed शब्दाची फोड केल्यास Milk+Weed अशी होते म्हणजेच दुधासारखा चीक असणारी गवत म्हणून वाढणारी  वनस्पती असा होतो.


Plant Profile:

Botanical Name: Calotropis procera (Aiton) W.T. Aiton
Synonyms: Asclepias procera, Calotropis wallichii, Madorius procerus
Common Name: Rubber bush, Apple of sodom, French cotton
Marathi Name: Rui (रुई) /Mandar (मंदार)
Family: Apocynaceae
Habit: Shrub
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, Grasslands (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Pink to Purple (गुलाबी ते जांभळा)
Leaves: Simple, opposite, 12-15 cm long, around 10 cm broad, ovate, cordate at base, sessile
Smell: Little fragrant
Abundance: Common
Locality: Narayangad Fort, Khodad, Junnar, Pune
Flowering Season: All year

Date Captured: 31-Jan-2016


रा.जा. डोंगरे

Sunday, 9 April 2017

Flowers: Tanner’s cassia, avaram, Maura tea tree | Tarvad – तरवड | Senna auriculata (L.) Roxb.

Habit of Senna auriculata
सह्याद्रीमध्ये भटकंती करताना जितकी घनदाट जंगलं आपल्याला भेटतात तितकीच माळरानं सुद्धा भेटतात. जंगलं बहुधा किर्रर्र आणि घनदाट, जुन्या वृक्षांची दाटी असलेली, एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा करणारी. या स्पर्धेत अजस्र वेली मोठ्या झाडांच्या फांद्यांचा आधार घेउन त्यांच्याच वर माना काढत झाडांना वाकुल्या दाखवत राहतात. काही वृक्षांची खोडं तर अगडबंब वैगेरे असतात, ती पाहून भीती वाटावी इतकी. इथलं जगही निराळंच, थंडगार सावली, पक्षांचे आणि प्राण्यांचे वेगेवेगळे आवाज, आजूबाजूला बागडणारी फुलपाखरं, फळझाडं वैगेरे, त्यामुळं निश्चितच उन्हाळ्याच्या दिवसांत इथं मन रमतं! याउलट उन्हाळ्यात माळरानं ओसाड पडलेली असतात कुठे कुठे एखादं दुसरं झुडूप दिसतं, कुणाची कुणाशी स्पर्धा नाही. चुकून एखादं जास्त वाढलं तर शेजारच्या झुडपाला त्याचं काहीही पडलेलं नसतं.

याच ओसाड माळरानांवर उन्हाळ्यात झुडपांचा आधार घेऊन डोंगरउताराला गुळवेलीच्या वेली फुलतात, त्याला सोबत म्हणून काटेचेंडू, धायटी, मंदार, गोविंदफळ वैगेरे वनस्पती सुद्धा फुललेल्या दिसतात. माळरानांवर फुलणारी आणि जिला वर्षभर फुले लागतात अशी एक वनस्पती आहे, ही माळरानांच्या सौंदर्यात नेहमी भर टाकत असते. छोटी छोटी झुडपं, हिरवीगार पानं, वाकड्या-तिकड्या पसरलेल्या फांद्या आणि प्रत्येक फांदीच्या टोकाला झुबक्यांनी लागलेली टपोरी पिवळी फुलं, काय आठवलं का नाव, अहो सर्वांच्या ओळखीची आणि चांगल्या परिचयाची झुडपं आहेत ही, हो हो तीच; तरवडाची!
Flowers of Senna auriculata
या झुडपांची एक लहानपणची आठवण आहे, याच्या कोवळ्या फांद्या मुख्य शाखेपासून ओढून वेगळ्या करायच्या आणि बोटाने साल फिरवून फिरवून काढायची. मधली दांडी सालीतून अलगद ओढून काढली कि सालीची पोकळ नळी शिल्लक राहते, मग या नळीचं तोंड एका बाजूने हलकं दाबायचं आणि त्याची छानशी सुरेल पिपाणी तयार करायची. ग्रामीण भागात असे प्रसिद्ध नसलेले पण गमतीदार खेळ खूप होते आणि आजही आहेत, त्यातलाच हा एक!

तरवड ही तशी माळराणी! वर्षभर फुलणारी, वाऱ्याच्या तालावर डुलणारी, कितीही ऊन असलं तरी ही आपली तशीच उभी असते; हसत मुखाने. पाणी असो-नसो, हिची कधीच तक्रार नसते. कुठल्याही परिस्थितीत फुलत राहायचं, हसत राहायचं एवढंच तिला माहित. माणसाला हा गुण या झुडपाकडून घेण्यासारखा आहे. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता हसत राहायचं आणि परिस्थितीचा सामना करायचा. असो आपण तरवडाची माहिती घेऊ.

तरवडाची झुडपं साधारण ३-५ फुटांपर्यंत वाढतात. जमिनीपासून ४-६ फांद्या निघतात, फांद्या मातीच्या किंवा काहीश्या विटकरी रंगाच्या असतात, त्यावर राखाडी किंवा पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. हे ठिपके म्हणजे झाडाच्या आतल्या पेशी (Cells) आणि उती (Tissue) यांच्याशी बाहेरील वातावरणाचा संपर्क राहण्यासाठीचे दरवाजे असतात. फांद्यांची साल बाहेरून मऊ असते, काही ठिकाणी साल थोडीशी पांढरी किंवा राखाडी रंगाची सुद्धा असू शकते. जमिनीतून निघालेल्या मुख्य शाखा आडव्या तिडव्या पसरलेल्या असतात. खालच्या बाजूला नवीन शाखा शक्यतो वाढत नाहीत, सर्व नवीन शाखा वरच्या बाजूला निघतात. तरवाडाची पाने ही पर्णिका (compound) प्रकारात मोडतात. म्हणजे पर्णिकांच्या ८-१० जोड्या पानाच्या मुख्य अक्षाभोवती लागलेल्या असतात. प्रत्येक पर्णिका गर्द हिरव्या रंगाची आणि लंबगोलाकार असते. टोकाला पर्णिका टोकदार असतात. पर्णिका एकमेकांवर आच्छादलेल्या (overlap) असतात. या सगळ्या पर्णिका मिळून एक पान होते. पानांची रचना नवीन फांद्यांवर शक्यतो दाटीवाटीने पण एकाड-एक अशा पद्धतीची असते. संपूर्ण पान ५-८ सेमी लांबीचे असते. पान शाखेला जिथे जोडलेले असते तिथे नवीन कोंब दिसतो, हे कोंब कधी नवीन शाखेत रूपांतरित होतात तर कधी मरून जातात.
Arrangement of Androecium and Gynoecium
तरवडाची फुले गर्द पिवळ्या रंगाची आणि नजरेत भरणारी असतात. फुलोरे नेहमी फांद्यांच्या टोकाला लागतात. प्रत्येक फुलाचा देठ २-३ सेमी लांबीचा असतो, फुलांचा व्यास साधारण ५ सेमी पर्यंत असतो. पाकळ्यांची संख्या ५ असते, यातील दोन पाकळ्या आकाराने मोठ्या तर इतर तीन आकाराने थोड्या लहान असतात. पाकळ्यांचा रंग पिवळा आणि चमकदार असतो. पाकळ्यांच्या खाली त्यांची हिरवट पिवळ्या रंगाची संरक्षण दले असतात. यातील दोन संरक्षण दले एकमेकांना आच्छादलेली असतात. पाकळ्यांच्या मध्यभागी १० पुंकेसर (Androecium) लागतात. यातील समोरचे तीन सर्वात लहान म्हणजे २-३ मिमी लांबीचे असतात, मध्यभागी चार पुंकेसर असतात आणि त्यांची लांबी साधारणपणे ५-६ मीमी असते. सगळ्यात मागच्या बाजूला तीन पुंकेसर लागतात आणि ते १ सेमी लांबीचे असतात. सर्व पुंकेसरांच्या मध्ये एक स्त्रीकेसर लागतो. श्रीकेसराचे अंडाशय (ovary) लांब आणि शेंगेसारखी दिसते. पुंकेसर आणि स्रिकेसर परिपक्व झाले कि मुंग्या परागीभवनासाठी मदत करतात. पक्षी, फुलपाखरे आणि इतर कीटकसुद्धा परागीभवनासाठी हातभार लावतात. पुढे फळधारणा होऊन ६-८ सेमी लांबीच्या शेंगा लागतात. शेंगा परिपक्व झाल्यावर गर्द विटकरी रंगाच्या होतात. वाळलेल्या शेंगा हलवल्यास आतल्या बिया खुळखुळ्यासारख्या वाजू लागतात. कालांतराने शेंगा झुडपापासून गळून पडतात आणि वजनाने हलक्या असल्याने आजूबाजूला पांगतात. पावसाने वरची टरपले सडतात, कधी उन्हाने फुटतात तर कधी जनावरांच्या वैगेरे पायाखाली येऊन बिया मोकळ्या होतात. योग्य वातावरणात रुजतात आणि वाढतात.

तरवड हे औषधी झुडूप आहे, मधुमेह म्हणजेच डायबेटीस या आजारावर ते गुणकारी आहे. लघवीसंदर्भातील तक्रारी आणि बद्धकोष्टत्यावरसुद्धा हे गुणकारी आहे. त्वचा उजळण्यासाठी स्रिया सालीची पावडर करून चेहऱ्यावर लेप लावतात. बियांची पावडर बनवून त्याचा लेप जळजळणाऱ्या डोळ्यांवर लावल्यास लवकर आराम मिळतो. तरवडाची साल आणि पाने गरम करून दुखऱ्या सांध्यावर बांधली जाते. या सर्व गुणांमुळे आयुर्वेदामध्ये तरवडाचे विशेष महत्व आहे.

Mature pods of Senna auriculata

तरवडाला इंग्रजी मध्ये Tanner's cassia अशा नावाने ओळखतात. शास्त्रीय भाषेत त्याला Senna auriculata (L.) Roxb. या नावाने ओळख आहे. तरवडाचा समावेश Caesalpiniaceae म्हणजेच गुलमोहराच्या कुळात केलेला आहे.

सध्या झपाट्याने होणारी जंगलतोड, नष्ट होणारी माळराने आणि मानवी हस्तक्षेपाने तरवड कमी कमी होत चाललं आहे, न जाणो कधी हा दुर्मिळ होऊन जाईल. वेळ अजून गेलेली नाही आपण थोडं मनावर घेतलं तर पुढच्या पिढीला आपल्याला हा बहुगुणी झुडपांचा लाभ घेता येईल.
Plant Profile:

Botanical Name: Senna auriculata (L.) Roxb.
Synonyms: Cassia auriculata
Common Name: Tanner’s cassia, avaram, Maura tea tree
Marathi Name: तरवड
Family: Caesalpiniaceae
Habit: Shrub
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, Grasslands (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Yellow (पिवळा)
Leaves: Compound, leaflets oblong, 1-2 cm long, mucronate, 8-12 pairs of leaflets, overlapping
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Narayangad fort, Khodad, Junnar, Pune
Flowering Season: All year
Date Captured: 09-Apr-2017


रा.जा. डोंगरे

Additional Photos:

Seeds of Senna auriculataSunday, 12 March 2017

Flowers: Divine Jasmin | Kalpendra / Pandhara – कल्पेंद्र / पांढरा | Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre

उन्हाळा म्हटलं की बाहेर पडायला नको वाटतं. त्यातल्या त्यात डोंगरवाटा तर नकोशा होतात. तसही उन्हाळ्यात काय पाहायचं डोंगरांवर, सुकलेलं गवत की पानगळ झालेली शुष्क झाडं? घरातली मंडळी सुद्धा बाहेर पडू देत नाही, उन्हात आजारी पडाल अशी तंबी देतात. मग काय घरातच काहीतरी उद्योग सुरु होतो, सावलीत खेळायचे जुने खेळ शोधून काढले जातात आणि डाव मांडला जातो. पण एखादी पाणथळ जागा किंवा हिरवं गार जंगल फिरायला काय हरकत आहे? सकाळी सकाळी लवकर उठून उन्हाच्या आधी एखादा फेरफटका मारला तरी एखादे दोन पक्षी, एखाद छानसं फुलपाखरू किंवा सुंदर फुल तुमचं लक्ष वेधून घेऊ शकतं आणि दिवस अगदी आनंदात जाऊ शकतो.


मागच्या वर्षीचा एप्रिल महिना मला आठवतो, असंच सकाळी लवकर आवरून सिंहगड किल्ल्याची वाट धरली होती. ऊन खूप म्हणून पायथ्याच्या जंगलात घुसलो, हिंडलो आणि दोन-तीन तासांच्या भ्रमंतीनंतर पुन्हा घरी निघालो. वाटेत येताना खडकवासला धरणाजवळ दोन तीन टपोऱ्या पांढऱ्या फुलांनी माझं लक्ष वेधून घेतलं, न राहवून गाडी बाजूला थांबवली. थोडं जवळ जाऊन पाहिलं, पण फुलांची ओळख काही पटेना. आणखी थोडं जवळ जाऊन निरीक्षणं  घेतली. फुलांना छान आणि मनमोहक सुगंध होता. सकाळपासूनच्या नकोशा झालेल्या उन्हात नवीन फुलं सापडल्याने मी मनोमन सुखावलो होतो. थोडा वेळ आजूबाजूला फिरून संपूर्ण झाडाचं नीट निरीक्षण केलं, आवश्यक त्या नोंदी करून घेतल्या आणि निघालो, परतीच्या प्रवासाला! येताना संबंध रस्त्यातून डोक्यात वेगवेगळ्या शक्यतांचं काहूर! कसली फुलं असतील ही नक्की? एक ना अनेक प्रश्नांना सोबत घेऊन मी घरी परतलो.


घरी पोहोचून शोधाशोध सुरु झाली आणि शेवटी नाव सापडलं;  कल्पेंद्र किंवा पांढरा असं ते नाव! कल्पनेपलीकडचं सौंदर्य आणि पांढऱ्या रंगाची टपोरी फुलं म्हणून हि नावं असावीत असं मला वाटतं आणि ती या फुलांना अगदी साजेशी आहेत. उन्हाळ्यात विशेषतः झाडांना (वृक्षांना) आणि झुडपांना फुलं लागतात. गवती वनस्पती क्वचितच फुलतात. उन्हाळ्यात माणसांना जसा उन्हाचा त्रास होतो तसाच त्रास साहजिकच प्राण्यांना, पक्षांना, फुलपाखरांना, मधमाशांना आणि इतर सजीवांना होत असणार. त्यामुळेच पक्षी किंवा इतर सजीव उन्हाच्या वेळी क्वचितच बाहेर पडताना दिसतात, शक्यतो ते सकाळी आणि संध्याकाळी जास्त प्रमाणात बाहेर पडतात. उन्हाच्या वेळी कुठेतरी शांत झाडाच्या सावलीत, घरट्यात किंवा कड्या-कपारीत विश्रांती घेतात. मग परागीभवनाच्या नैसर्गिक आणि दैवी कार्याला या सर्व सजीवांना उद्युक्त कसं करायचं? पण निसर्गात सर्व गोष्टींची सोय केलेली असते, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला असतो. उन्हाळ्यात जी फुले लागतात ती शक्यतो सुगंधी तरी असतात किंवा ती दिसायला सुंदर आणि भडक रंगांची तरी असतात, कधीकधी तर हे दोन्ही गुणधर्म एकाच फुलात दिसतात. कल्पेंद्र सुद्धा सौंदर्य आणि सुगंध हे दोन्ही गुण अंगी बाळगणारा आहे. मग साहजिकच पक्षी, कीटक, फुलपाखरे, मधमाशा वैगेरे फुलांकडे आकर्षित होतात आणि परागीभवनाचे सोपस्कार पार पडतात. असो, आपण कल्पेंद्र या वृक्षाची माहिती या लेखात आज घेऊ.


कल्पेंद्र तसा पाणथळ, तळ्याकाठचा, नदीकाठचा अथवा दलदलीच्या भागातला लहान उंचीचा वृक्ष.  उंची साधारणपणे १२ ते १५ फुटांपर्यंत असते. वृक्षाचा पसारा साधारणपणे ७ ते १० फुटांपर्यंत असतो. कल्पेंद्रचे खोड कडक काळपट करड्या रंगाचे आणि साल खरखरीत असते. नवीन फुटलेल्या फांद्या गोलाकार नसून चौकोनी असतात. वृक्षाच्या सर्वांगावर आडव्या छोट्या फांद्या वाढतात आणि या छोट्या फांद्यांच्या टोकाला काट्यांच्या एक किंवा दोन जोड्या वाढतात.

काटे तीक्ष्ण असल्याने झाडावर प्राण्यांना चढण निव्वळ अशक्य होतं, यामुळं फुलांचं आणि फळांचं रक्षण आपोआप होतं. नवीन वाढलेल्या फांद्यांवर ५ ते ८ सेमी लांबीची आणि साधारणपणे ३ सेमी रुंदीची पाने लागतात. पानांची रुंदी टोकाकडे अधिक असते आणि देठाकडे ती कमी कमी होत जाते. टोकाकडचा भाग गोलाकार असल्याने ती देठाकडून पाहिल्यास फुगवलेल्या फुग्याच्या आकाराची किंवा अंडाकृती दिसतात. देठ साधारणपणे १ ते १.५ सेमी लांबीचा असतो. पानांचा रंग मंद हिरवा आणि चमकदार असून काठ एकसंध असतो. जोडणी एकमेकांच्या विरुद्ध असते, कधी कधी पाने छोट्या फांद्यांच्या टोकाला पुंजक्यांच्या स्वरूपात सुद्धा वाढतात. उन्हाळ्याच्या सुरवातीला जुनी पाने गळून टोकाला नवीन पाने येतात.


कल्पेंद्रची खरी ओळख आहे ती त्याच्या सुंदर आणि मनमोहक सुगंधासाठी. एका फुलोऱ्यात एक ते तीन फुलं असतात. फुलांचा रंग शुभ्र पांढरा असतो आणि उन्हात तो आणखी चमकदार होतो. फुलं टपोरी म्हणजे साधारणपणे २-३ सेमी व्यासाची असतात. यामध्ये पाच पाकळ्यांची संरक्षण दले, पाच पांढऱ्या शुभ्र पाकळ्या, पाच पुंकेसर आणि एका स्रिकेसराचा समावेश असतो. पाकळी गोलाकार असून ती बाजूच्या पाकळीच्या काठावर पसरलेली (Overlap) असते. दोन पाकळ्यांच्या मध्ये आणि तळाला पुंकेसर वाढतो. परिपक्व झाल्यावर तो पाकळ्यांच्या बाजूला बाहेरून नागमोडी वळतो आणि त्यांचा रंग काहीसा तांबूस किंवा खाकी होतो. त्यातून पुढे परागकण बाहेर पडतात. पुंकेसरांच्या मधोमध पिवळ्या किंवा केशरी रंगाचा स्रिकेसर येतो, तो परिपक्व झाला की टोकाला दोन दलांत विभागला जातो. स्रिकेसर आणि पुंकेसराचे दांडे खूप लहान अगदी न दिसणारे असतात. संपूर्ण स्रिकेसर किंवा पुंकेसर फार तर अर्धा सामी लांबीचे असतात. फुलांचा रंग मध्यभागी काहीसा हिरवा असतो, त्यामुळे परागीभवनासाठी येणारे पक्षी, कीटक, मधमाशा किंवा फुलपाखरं योग्य ठिकाणाकडे आकर्षित होतात, एका फुलावरून दुसऱ्या फुलांवर बसणं-उठणं होतं आणि परागीभवनाची प्रक्रिया पार पडते. सह्याद्रीतील खट्याळ वारादेखील या निसर्गकार्यात सहभागी असतो. पुढे निसर्गनियमाने फळधारणा होते, साधारणपणे ४-५ सेमी लांबीची म्हणजेच पेरूच्या किंवा चिक्कूच्या आकाराची फळे लागतात. फळे पिकून पुढे पिवळसर केशरी रंगाची होतात. फळं बेरी या प्रकारातील असून निसर्ग लहान लहान बिया आतील गरामध्ये पेरतो. पूर्ण पिकलेली फळं जमिनीवर पडतात, सडतात आणि यातील काही बिया योग्य वातावरणात रुजतात.

कल्पेंद्रला योग्य प्रमाणात पाणी असल्यास वर्षभर फुलं लागतात. त्याच्या सुंदर फुलांमुळे आणि मनमोहक सुगंधामुळे त्याची लागवड काही ठिकाणी बागेत केलेली दिसते. अर्थात या सौंदर्याचा लाभ घेताना त्यावरचे काटे विसरू नयेत. कल्पेंद्र रुबीऐसी (Rubiaceae) या कुळातील असून त्याला Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre असं शास्त्रीय नाव आहे. यातील Tamilnadia हे जातीचं नाव तामिळनाडू या नावावरून आल्यासारखं वाटतं.कल्पेंद्र हा या जातीतील एकमेव वृक्ष आहे. मराठीमध्ये याला पांढरा असही एक नाव आहे. इंग्रजीमध्ये याला Divine Jasmin नावाने ओळखतात.
Plant Profile:


Botanical Name: Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre
Synonyms: Gardenia uliginosa, Catunaregam uliginosa, Randia uliginosa, Gardenia pomifera
Common Name: Divin Jasmin
Marathi Name: कल्पेंद्र, पांढरा
Family: Rubiaceae
Habit: Tree
Habitat: Near water bodies and moist soil (पाणथळ, तळी, नदीकाठ किंवा दलदल)
Flower Colour: White (पांढरा)
Leaves: Simple, oblong, 5-8 cm long and 3-4 cm wide, entire margin
Smell: fragrant
Abundance: Common near water bodies
Locality: Khadakwasala Dam, Pune
Flowering Season: March-May
Date Captured: 10-Apr-2016
-       रा.जा. डोंगरे