Tuesday 8 March 2016

Flowers: Sneeze Wort | (हरणदोडी - Harandodi) | Dregea volubilis (L.f.) Benth. ex Hook.f.

Flowers of Dregea volubilis
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत काय खेळ खेळायचे असा प्रश्न नेहमी बच्चे कंपनीसमोर असायचा, विशेषतः ग्रामीण भागात तर दर वर्षी हा प्रश्न नेहमीचाच, मग या अशा प्रश्नातून नवीन खेळांचा शोध घेतला जायचा. असाच एक ग्रामीण खेळ म्हणजे कावळीवर्गीय वेलींच्या फळांतून निघणार्या म्हातार्या हवेत उडवत बसायच. तासंतास हा खेळ चालायचा, या उडणार्या म्हतार्यांसोबत, बालमनं मुक्त आकाशात भरारी मारून यायची.

अशीच एक वेल म्हणजे "हरणदोडी"! बहुधा डोंगररांगांवर विशेषतः उतारावर असणाऱ्या लहानशा झुडपांवर ही वाढते, त्यातल्या त्यात बाभूळ आणि खैर ही आधारासाठीची आवडती झाडे. झुडपांच्या खोडांपासून काहीसं जाड, पिवळसर करड्या रंगाचे, पिळदार, खरबरीत सालीचे खोड बाजूच्या झाडाच्या फांद्यांमध्ये घुसते, त्यांचा आधार घेऊन संपूर्ण झाडावर आपल्या वेली पसरवते. हरणदोडीची मुळे पाण्याच्या शोधत खोलवर जमिनीमध्ये जातात. नवीन फांद्या हिरवट करड्या किंवा हिरवट पिवळ्या रंगाच्या असतात. पावसाळ्यामध्ये हरणदोडीला पाने थोड्या जास्त प्रमाणात लागतात आणि उन्हाळ्यात मात्र कमी होतात, यामुळे पाण्याची बचत होते. पानांची लांबी साधारणपणे ८ ते १५ सेमी. तर रुंदी ४ ते ६ सेमी असते. रंग गडद हिरवा, स्पर्श अतिशय मुलायम असतो. पानांची रचना एकाड-एक अशा स्वरुपाची असते, देठ १.५ ते २ सेमी असतो. कड एकसंध असते. साधारणपणे एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात वेलींवर हिरव्या किंवा काहीशी हिरवट पिवळ्या रंगाची फुले लागतात. शक्यतो एकाड-एक पानांमधून एक फुलोरा लागतो. प्रत्येक फुलोर्यात साधारणपणे १० ते १५ फुले छत्रीसारख्या अर्धगोलाकार आकारात लागतात. फुलोरे उलटे लटकले की झुंबर लावल्याचा भास होतो आणि म्हणूनच काही ठिकाणी "अंबारी" नावाने या वेलीला ओळखले जाते. फुलोर्यातील प्रत्येक फुल साधारणपणे १ सेमी व्यासाचे असते.


Habit & Habitat of Dregea volubilis
हरणदोडीच्या कुळातील वनस्पतींमधे फुलांची विशिष्ठ रचना पाहायला मिळते. ही रचना या कुळाचे वेगळेपण स्पष्ट करते. पाकळ्यांची संख्या ५ आणि रंग हिरवा असतो. पाकळयांच्या वर पुंकेसरांची वेगळी आणि वैशिष्ठ्यपूर्ण रचना आढळते. पुंकेसरांची संख्या ५ असते, पण हे सारे एकमेकांना अशा प्रकारे जोडलेले असतात की प्रत्येक पुंकेसर वेगळा असा ओळखता येत नाही. इतर वनस्पतींमध्ये परागकण सहसा थेट पुंकेसारामध्ये तयार होतात, तर या वनस्पतींमध्ये पुंकेसरात pollinia म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या छोट्या पिशव्यांच्या जोड्या असतात, या पिशव्या छोट्या धाग्याने आणि एका ग्रंथीच्या मदतीने एकमेकांशी जोडलेल्या असतात. या पिशव्यांमधून पुढे परिपक्व परागकण बाहेर पडतात. स्रीकेसराची सुद्धा विशिष्ठ रचना या वनस्पतींमध्ये पाहायला मिळते, एका स्रिकेसरामधे दोन बीजांडकोश, कुक्षीला जोडणाऱ्या दोन नलिका आणि एक कुक्षी अशी विशिष्ठ रचना पाहायला मिळते. यामुळे हरणदोडी किंवा या कुळातील इतर वनस्पतींना बहुधा हिरव्या रंगाच्या फळांच्या जोड्या दिसतात. एकट फळ फारच कमी वेळा पाहायला मिळतं.
Fruits of Dregea volubilis
मुंग्या, पक्षी, फुलपाखरे आणि इतर नैसर्गिक घटक परागीभावनाची प्रक्रिया सुलभ करतात. या प्रक्रियेत मुंग्या आणि सुर्यपक्षांचा मोलाचा वाटा असतो. मुंग्या फुलोर्यांवरून फिरताना परागकण त्यांच्या पायावर आणि इतर अवयवांना चिकटतात आणि कुक्षीपर्यंत नकळत पोहोचतात.
फळे पुढे परिपक्व होतात आणि त्यांचा रंग पिवळा होतो, सालीतील पाण्याचं प्रमाण कमी होत,  त्यावर सुरकुत्या येतात,आणि फळे एका बाजूने फुटतात. पांढर्या रंगांचे केस असलेले बी यातून बाहेर येतात आणि वार्यावर स्वार होऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. बियांचा प्रसार सोपा व्हावा म्हणून निसर्गाने केलेली ही विशेष सोय असावी.
हरणदोडीच्या कुळाला "Milkweed Family" म्हणून देखील ओळखल जातं, त्याच कारण असं की या वनस्पतीच्या सर्वच भागांमध्ये दुधासारखा पदार्थ असतो. एखाद पान सहज तोडून पाहिलं तर त्याचा प्रत्येय येतो. हरणदोडीला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. हरणदोडीच्या एका इंग्रजी नावामध्ये "Sneeze" असा शब्द आला आहे, त्याचही कारण खूप गमतीशीर आहे. Sneeze चा मराठी अर्थ आहे "शिंक" आणि हरणदोडीच्या कोवळ्या मूळांमधून स्रवणारा दुधी द्रव नाकात घातल्यास शिंका येतात आणि म्हणून या शब्दाचा उल्लेख आढळतो.

हरणदोडीला इंग्रजी भाषेत Sneeze Wort, Cotton Milk Plant, Green Milkweed Climber, Green Wax Flower अशा विविध नावाने ओळखले जाते तर शास्रीय भाषेत Dregea volubilis म्हणून ओळखतात. हरणदोडी हे Asclepiadaceae या कुळामध्ये मोडते.

Seed Dispersal of Dregea volubilis
Seed Dispersal of Dregea volubilis

Botanical Name: Dregea volubilis (L.f.) Benth. ex Hook.f.

Synonyms: Asclepias volubilis, Dregea formosana, Wattakaka volubilis

English Name: Sneeze Wort, Cotton Milk Plant, Green Milkweed Climber, Green Wax Flower

Marathi Name: Harandodi (हरणदोडी), Nakhsikani (नखसिखणी)

Sanskrit Name: Hemjivanti (हेमजीवंती)

Family: Asclepiadaceae

Locality: Pune (Vetal Hills)

8 comments:

  1. Thanks for the blog post. I have been seeing these pods but could not make out of which tree/ climber.

    ReplyDelete
  2. बाभळी, खैर यांच्या सोबत ह्या वेली आहेत आमच्या कडे. रोजच्या डोंगरफेरीत ह्या बऱ्याच डोंगर लवणात आणि झुऱयांमध्ये आढळतात.

    ReplyDelete
    Replies
    1. कुठे rahatat apan sir

      Delete
  3. माहितीबद्दल धन्यवाद मात्र याचा वापर कसा आणि कुठे करायचा याबद्दल कोणी माहिती देईल का गुडघेदुखी साठी वापरले जाते असे ऐकिवात आहेत

    ReplyDelete
  4. थँक्स 🌹👌

    ReplyDelete
  5. सासवड

    ReplyDelete