Sunday 1 May 2016

Flowers: Small-Bearded Dendrobium | Gulabi Dande Amari - गुलाबी दांडेअमरी | Dendrobium barbatulum Lindl

"ऑर्किड" बहुधा सर्वांच्याच वाचनातला आणि ऐकण्यातला शब्द! दूरच्या प्रवासात कुठे उंच इमारतींवर तर कधी शहरांमधल्या मोठ्या हॉटेल्सवर हा शब्द अगदी नेहमीचा वापरातला आहे. खरच या शब्दाचं एवढ काय आकर्षण असावं? या शब्दाचा अर्थ तरी काय? कुठून आला हा शब्द? असे एक ना अनेक प्रश्न अशा वेळी मनात घर करून बसतात. या प्रश्नाचं उत्तर प्रवासातील एखाद्या सोबतीकडे मिळालं तरी फार फार तर "ऑर्किड हे एक सुंदर फुल आहे" इथपर्यंत मर्यादित राहते. मग हे उत्तर नवीन प्रश्नाला जन्म देऊन जातं; आपल्या आजूबाजूला बाकी कितीतरी सुंदर फूलं आहेत, "गुलाब, मोगरा, जाई, जुई" अजून अशी असंख्य नाव घेता येतील की ज्यांच्या सौंदर्याने मानवी मनाला भुरळ पडते. पण ऑर्किडचं तितकंस ऐकण्यात नाही, असं काय खास आहे ऑर्किडमध्ये कि हे नाव देखील एवढं आदबीने घेतलं जावं.

नक्कीच खास आहे, कारण ऑर्किडला जगातील सर्वाधिक सुंदर फुलांचा मान मिळालेला आहे, सौंदर्य इतकं की पाहता क्षणी प्रेमात पाडावं. अर्थात जगातील सर्वाधिक सुंदर फुल ऑर्किड आहे यावरच तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. ऑर्किडच्या सौंदर्यात अशी काही जादू आहे की सभोवतालच्या परिस्थितीचा क्षणभर विसर पडावा, आणि नकळत निसर्गाचा प्रत्येक घटक त्यामध्ये वाहवत जावा. इथे संपूर्ण निसर्ग असा उल्लेख मी मुद्दाम करतो आहे, कारण फक्त मानवच नाही तर कीटक, फुलपाखरे, पक्षी, भुंगे आणि संपूर्ण जीवसृष्टीवर ऑर्किडच्या फुलांची भुरळ पडते. एका वाक्यात सांगायचं झाल तर "ऑर्किड म्हणजे मोहिनी आहे आणि ती प्रत्येकावर लागू होते".

सौंदर्याप्रमाणेच ऑर्किडची आणखी काही वैशिष्ठे आहेत त्यातलं मुख्य म्हणजे हे कुळ जगातील सर्वाधिक प्रजाती असणार्यांपैकी एक आहे, अर्थात हा शास्राज्ञांमध्ये थोडा वादाचा मुद्दा आहे. काही शास्रज्ञ म्हणतात की एस्टर (Aster) या कुळामध्ये सर्वाधिक वनस्पती आहेत तर काहींचा असा दावा आहे की ऑर्किडचा कुळामध्ये सर्वाधिक वनस्पती आहेत. असो, एकट्या ऑर्किड या कुळामध्ये ८८० जाती आणि २७८०० प्रजातींचा समावेश आहे, याव्यतिरिक्त नवीन प्रजातींवर जगभर संशोधन सुरु आहे.

ऑर्किड्समध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, जमिनीवर वाढणारे आणि वृक्षांच्या खोडांमध्ये किंवा फांद्यांवर वाढणारे. यातील जमिनीवर वाढणार्या ऑर्किड्समध्ये मुळांची जागा छोट्या बटाट्यासारख्या मुळाने घेतलेली असते. या बटाट्यांमधून पुढे वेगवेगळे कोंब फुटतात आणि वाढतात. नवीन कोंबावर फुले लागतात पुढे परिपक्व होऊन फळे आणि बिजप्रसार होतो. हे चक्र पूर्ण झालं की हाच जुना कोंब पुढे वाढून नव्याने पुन्हा तेच चक्र सुरु होतं. या विशिष्ठ चक्रामुळे काही ऑर्किड्स काही मीटर पर्यंत वाढतात. जमिनीवर वाढणाऱ्या काही ऑर्किड्स मध्ये फक्त फुलं आणि फळं येउन गेली कि फुटवे मरून जातात, पण मुळं मात्र तग धरून असतात, ती वाट पाहत असतात योग्य संधीची, एका पावसाची! याउलट वृक्षांच्या खोडात वाढणारी ऑर्किड्स दर वर्षी नवीन जन्म घेतात. एकदा वाढलेली फांदी प्रजननाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गळून पडते आणि नवीन वर्षी नव्या फांद्या फुटतात. यामध्ये देखील मूळांच्या रूपाने ऑर्किड निसर्गात मुक्त श्वास घेत असतं आणि त्या प्रत्येक श्वासाला ओढ असते ती पावसाच्या थेंबांची. झाडांच्या खोडांत वाढणारी ऑर्किड्स ही बहुधा Epiphytic या प्रकारातील असतात म्हणजेच ते कुठल्यातरी वृक्षाच्या फांद्यांवर किंवा खोडांत वाढतात पण अन्नद्रव्यांसाठी ते त्यावर अवलंबून नसतात. या विशिष्ठ ऑर्किड्सच्या मुळांमध्ये पेशींची विशिष्ठ रचना असते, पेशीचा प्रेत्येक कोन हा जवळ जवळ काटकोन असतो, त्यामुळे मुळांच्या बाह्यरचनेवर त्याचा परिणाम होतो. मुळं शक्यतो मुख्य वृक्षाच्या फांदीला चिकटून आणि समांतर वाढतात. या अजब वाढीमुळे ऑर्किडला वरच्या वाढीसाठी आणि संपूर्ण डोलारा सांभाळण्यासाठी आधार मिळतो. ही मुळे हवेतील आद्रता आणि मुख्य वृक्षाच्या फांदीवरील अन्नद्रव्य शोषून घेतात. एवढं पाणी आणि अन्नद्रव्य ऑर्किडला पुरेशी असतात.

ऑर्किड्सची फुले दिसायला आकर्षक असतात, पण यामध्ये एक गंमत आहे ती म्हणजे फुले झाडावर उलटी लागतात. म्हणजेच वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर अशा प्रकारे. फुलाची दांडी ही १८० कोणामध्ये वळलेली असते, अर्थात हे आपण वरवर पाहताना लक्षात येत नाही. आणखी एक गमतीदार गोष्ठ म्हणजे ऑर्किडच्या बिया अतिशय सूक्ष्म असतात, सूक्ष्म म्हणजे नुसत्या डोळ्यांनी दिसण्याइतपत सूक्ष्म, त्यासाठी सूक्ष्मदर्शी (Compound Microscope) चा उपयोग करावा लागतो. फळे परिपक्व झाल्यानंतर जेव्हा फळे फुटतात तेव्हा लाखो बिया यातून बाहेर पडतात आणि हवेवर स्वार होऊन पुढच्या पिढीच्या तयारीला लागतात. अशा लाखो आणि अतिसूक्ष्म बिया निर्माण करण्याचं कारण म्हणजे, ऑर्किडच्या बियांना रुजण्यासाठी बुरशी (fungus) ची गरज असते, त्याशिवाय त्या रुजल्या जात नाहीत. हवेवर स्वार झालेल्या बियांपैकी एक टक्क्याहून कमी बिया योग्य त्या बुरशीच्या संपर्कात येतात आणि रुजतात, उरलेल्या मरून जातात. या एवढ्या एका कारणामुळे ऑर्किडला एका फळामध्ये लाखो बिया निर्माण करण्याची क्षमता निसर्गाने दिली असावी!


गुलाबी दांडेअमरीबद्दल थोडसं:

सह्याद्रीमध्ये सर्वत्र आणि सहज वाढणार असंच एक सुंदर ऑर्किड म्हणजे "गुलाबी दांडेअमरी" इंग्रजीमध्ये याला "Small-Bearded Dendrobium" नावाने ओळखतात. गुलाबी दांडेअमरी ही समुद्रसपाटीपासून साधारणपणे - हजार फुट उंचीच्या प्रदेशामध्ये वाढते. अर्थात जिथे तुम्हाला हे ऑर्किड दिसेल तिथे तुम्ही त्या उंचीवर पोहोचला आहात असा सरळ अर्थ लावण्यास हरकत नाही. ऑर्किड्सला पाणी कमी आणि सूर्यप्रकाश अधिक लागतो म्हणून ही ऑर्किड्स या उंच प्रदेशात जन्माला येत असावीत, इथे सगळंच त्यांना हवं तसं मिळतं.

पावसाळ्यानंतर "गुलाबी दांडेअमरी" ची वाढ झाडांच्या खोडात आणि फांद्यांवर व्हायला सुरवात होते. पाने एकाड-एक स्वरूपामध्ये लागतात आणि गर्दीने वाढतात. प्रत्येक पान हे मांसल आणि गर्द हिरवे असते, लांबी साधारणपणे १०-१२ सेमी पर्यंत आणि रुंदी सेमी पर्यंत असते. पानांच्या शिरा एकमेकांना समांतर वाढतात आणि त्या सर्व टोकाकडे एकत्र भेटतात. वरच्या बाजूने पाहिल्यास एखाद्या फुलाप्रमाणे पानांची रचना भासते. पानांच्या मध्यातून जांभळ्या किंवा मरून रंगाची एक दांडी बाहेर पडते, साधारणपणे १०-१५ सेमी लांबीची. हे दिवस असतात हिवाळा संपून उन्हाळा सुरु होण्याचे, साधारणपणे फेब्रुवारीचा शेवट आणि मार्चची सुरुवात. योग्य उन्हाचा चटका पडू लागला कि या दांडीवर -१५ टपोरी गुलाबी किंवा काहीशी मंद जांभळ्या रंगाची फुले लागतात. प्रत्येक फुल साधारणपणे - . सेमी लांबीचे असते. बाहेरील बाजूला तीन गुलाबीमिश्रित मंद जांभळ्या रंगाची पाकळ्यांची संरक्षण दले असतात त्याच्या आत पुन्हा याच रंगाच्या तीन पाकळ्या. त्यातली मुख्य पाकळी खालच्या बाजूने असते. फुलाच्या मध्यभागी पिवळा रंग असतो, हा रंग पुढे परागीभवनासाठी कीटक आणि पक्षांना आकर्षित करण्यासाठी मदत करतो. ऑर्किड्समध्ये तीन पुंकेसर असतात, त्यातील दोन प्सुडो (psudo) म्हणजे निकामी असतात. अर्थात त्यांच्यामध्ये परागकण निर्माण करण्याची क्षमता नसते. यातला एकटा पुंकेसर हा इतके परागकण निर्माण करतो की त्या फुलासोबत आजूबाजूची सर्वच फुले तो फलित (fertilize) करू शकतो.


तयार झालेले परागकण पक्षी, फुलपाखरे आणि कीटक कुक्षी पर्यंत नेउन पोहचवतात. परागकण वाहनाची प्रक्रिया अतिशय गमतीशीर आणि निसर्गाची किमया सांगणारी आहे. परागकण एकदा का परिपक्व झाले की ते पुंकेसारातून बाहेर येतात. ऑर्किड्समध्ये मात्र पुंकेसरातून परागकणांच्या पिशव्या बाहेर पडतात, या पिशव्यांना polinia म्हणतात. पुंकेसारातून या पिशव्या बाहेर पडत असताताना त्या विशिष्ठ एका बाजून पडतात, कारण या बाजूवर चिकट स्राव असतो. कीटक, फुलपाखरे किंवा पक्षी फुलाला भेट देतात तेव्हा त्यांच्या अंगावर या पिशव्या या स्रावामुळे चिकटतात आणि हे कीटक पुंकेसरावरून निघाले की या पिशव्या पुंकेसारातून ओढल्या जाऊन वेगळ्या होतात. या पक्षांसोबत किवा किटकांसोबत या polinia प्रवास करतात, प्रवासादार्म्याने हवेच्या जोराने polinia आपली कूस बदलतात आणि पुढील फुलावर बसेपर्यंत ही चिकट स्राव असलेली बाजू पुन्हा समोर येते. मग नशिबाने यातल्या काही पिशव्या योग्य स्रिकेसरावर चिकटत आणि पुढील प्रजननाचे सोपस्कार सुरु होतात.

प्रजननाच्या प्रक्रियेनंतर तीन दलं असलेली फळे लागतात आणि पुढे मग बिया भरल्या जातात. फळे परिपक्व झाली की ती फुटून लाखो बिया एकाच वेळेला बाहेर पडतात, हवेवर स्वार होऊन निघतात बुरशीच्या शोधयात्रेला. या शोधयात्रेत कुणाला बुरशी मिळते तर कुणाला नाही. या सर्व प्रवासात गुलाबी दांडेअमरीच्या फुलांचं आयुष्य फक्त पंधरा दिवसांचं असतं, पण या पंधरा दिवसांत संपूर्ण सृष्टी यांच्या सौंदर्याचे गोडवे गात असते.

गुलाबी दांडेअमरीला शास्रीय भाषेत "Dendrobium barbatulum Lindl. अशा नावाने ओळखतात, या सौंदर्यवतींचा समावेश "Orchidaceae" या कुळामध्ये करण्यात आलेला आहे.

Plant Profile:

Botanical Name: Dendrobium barbatulum Lindl
Synonyms: NA
Common Name: Small-Bearded Dendrobium
Marathi Name: Gulabi Dande Amari (गुलाबी दांडेअमरी)
Family: Orchidaceae
Habit: Herb
Habitat: Deciduous forest (पानगळीची वने)
Flower Colour: Pink to violate (गुलाबीमिश्रित मंद जांभळा)
Leaves: Simple, Leathery, Linear, parallel venation
Smell: No Smell
Abundance: Common in Sahyadri ranges on hill tops and deciduous forests.
Locality: Durgawadi, Junnar, Rural Pune, MH
Flowering Season: March to May
Date Captured: 25-Mar-15

6 comments:

  1. Rajkumar, very nicely written, informative and readable about orchids and all.

    ReplyDelete
  2. Rajkumar, very nicely written, informative and readable about orchids and all.

    ReplyDelete
  3. Rajkumar,very nice and detailed information about orchids will definitely share this with my friends.

    ReplyDelete
  4. Excellent

    ॐकार कुलकर्णी दानोळी

    ReplyDelete