Saturday 6 May 2017

Flowers: Medhshingi | Medhshingi (मेढशिंगी), Bhedshingi (भेडशिंगी)| Dolichandrone falcata (Wall. ex DC.) Seem.

Flowering twig
मेढशिंगी! उन्हाळ्यात फुलणारं एक सुंदर आणि सुगंधी फुल. उन्हाळ्याच्या दिवसांत भर दुपारी उघड्या बोडक्या माळरानावरून चालताना अशी रानफुलं रस्त्यात भेटतात. त्यांचा सुगंध, सौंदर्य आपल्याला भुरळ घालतं, थकवा आणि उन्हाची तीव्रता घालवतं. मेढशिंगी उन्हाळ्यातील एक मुख्य फुल, महाराष्ट्रापासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे कमी अधिक फरकाने हा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. यांचा मुख्य आदिवास म्हणजे 'भारत', ही फुलं इथली प्रदेशनिष्ठ आहेत.


मेढशिंगीला आणखी एक नाव आहे भेडशिंगी. दोन्ही नावांमध्ये 'शिंगी' या शब्दाची पुनरावृत्ती दिसते, त्याचं कारण या वृक्षाच्या शेंगा आहेत. या शेंगांचा आकार  मेंढीच्या शिंगांसारखा अर्धगोलाकार असून त्यावर आडव्या रेषा असल्याचा भास होतो आणि म्हणून त्या अर्थाने दोन्ही नावात 'शिंगी' शब्दाचा उल्लेख दिसतो. मेढशिंगी हा वृक्ष साधारणपणे १० ते २० फुटांपर्यंत वाढतो. उघडी बोडकी माळरानं, पानगळीची व शुष्क वनं आणि हलका डोंगर उतार असणाऱ्या जागांवर हा छान वाढतो. मेढशिंगी खूप कमी वेगाने वाढणारं झाड आहे, त्याच्यामध्ये कमी पाण्याच्या ठिकाणी तग धरून राहण्याची क्षमता आहे त्यामुळे त्याला पाणी थोडंसं कमी असलं तरी फारसं बिघडत नाही. विशेष म्हणजे चांगला पोत असणाऱ्या जमिनीत याची लागवड केली तरी फारशी विशेष वाढ याची होताना दिसत नाही, कारण नैसर्गिकरित्या तो खूप हळू वाढणारा वृक्ष आहे.

Habit (Entire Tree)

मेढशिंगीचे खोड टणक आणि मजबूत असते. खोडावरील आणि मुख्य फांद्यांवरील साल बहुधा खपल्या निघालेली आणि खरबरीत असते, रंग राखाडी असतो. मेढशिंगी बहुधा सरळ वाढते आणि फांद्यांचा पसारा कमी असल्याने झाडाचे खोड जास्त जाड होत नाही. मुख्य फांद्या सुद्धा खोडाप्रमाणे टणक असतात. मेढशिंगीची पाने संयुक्त प्रकारात मोडतात, म्हणजे ५ ते ६ पर्णिका मिळून एक पान तयार होते. सर्व पर्णिका मुख्य अक्षावर जोडलेल्या असतात. प्रत्येक पर्णिका ही साधारणपणे ३-६ सेमी लांबीची असते. पर्णिकांचा आकार हा अंडाकृती किंवा गोलाकार असतो. टोकाकडे पर्णिका क्वचितच टोकदार असतात. संपूर्ण पान ४-६ इंच लांबीचे असून पानांचा देठ २ सेमी लांबीचा असतो. नवीन फांद्यांच्या टोकाला २-३ फुलांचे फुलोरे लागतात. प्रत्येक फुल ५-७ सेमी लांबीचे आणि साधारण ३ सेमी व्यासाचे असते. फुल समोरच्या बाजूने पाहिल्यास पिपाणी सारखा त्याचा आकार दिसतो. फुलाच्या खालच्या भागात एक संरक्षणदल असते, त्याचा रंग पोपटी असून लांबी २-सेमी पर्यंत असते. फुलाची खालची बाजू हे संरक्षणदल वेढून घेतं आणि फुलाला संरक्षण देतं. टोकाकडे हे संरक्षणदल पाकळीसारखं भासतं आणि ते फुलाच्या नळीपासून थोडंसं गेलेलं असतं. संरक्षणदलाच्या टोकापासून पाकळ्या बाहेरील बाजूला वक्राकार वळतात. खालच्या बाजूला एकमेकांना जोडलेल्या पाकळ्या टोकाकडे वेगळ्या होतात. पाकळ्या पांढऱ्या शुभ्र असून बाहेरील बाजू झालरीसारखी दिसते. स्त्रीकेसर आणि पुंकेसर फुलाच्या पोकळ नळीमध्ये असतात.


मे महिन्यात फुलांची वाढ पूर्ण झाली की चमकदार पांढरा रंग, झालरीसारख्या पाकळ्या आणि मनमोहक सुगंध याच्या जोरावर पक्षी, फुलपाखरं, मधमाश्या, भुंगे, मुंगळे वैगेरे वृक्षाकडे आकर्षित होऊ लागतात. पक्षांमध्ये सूर्यपक्षी विशेष हजेरी लावतात, आपल्या लांब आणि वक्र चोचीने फुलातील मकरंद चाखतात. या सर्वांमुळे प्रजननाची प्रक्रिया पार पडते आणि फळधारणा होते. मेढशिंगीच्या शेंगा साधारणपणे २-३ फुटांपर्यंत वाढतात. शेंगा परिपक्व होताना वर सांगितल्याप्रमाणे मेंढीच्या शिंगांसारख्या वक्र होतात आणि त्यांचा रंग बदलून खाकी किंवा सौम्य चॉकलेटी होतो. उन्हाच्या चटक्याने शेंगा फुटतात आणि बिया जमिनीवर विखुरतात. बियांचा आकार साधारणपणे १-१.५ सेमिचा असतो. बिया चपट्या आणि आयताकृती असून दोन्ही बाजूने त्यांना लांब पंख असतात. हवेच्या जोरावर आणि पंखांच्या साहाय्याने या बिया आजूबाजूच्या परिसरात पसरतात. पावसाळ्यानंतर योग्य वातावरण मिळालं कि रुजतात.



मेढशिंगी हा भारतीय वृक्ष असूनही त्यावर विशेष संशोधन झालेलं नाही, आयुर्वेदामध्ये पोटदुखी आणि अनावश्यक गर्भधारणा यावर उपाय म्हणून मेढशिंगी वापरल्याचे दाखले आहेत परंतु नव्या युगाचं विशेष असं संशोधन झालेलं दिसत नाही. काही निवडक संशोधनातून त्याच्यातील रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास झाला आहे आणि त्यातील निष्कर्षाप्रमाणे मेढशिंगीमध्ये 'ई' जीवनसत्व आढळलं आहे. मेढशिंगी हा खूप सावली देणारा वृक्ष नसला तरी कमी पावसाच्या आणि कमी पाण्याच्या परिसरात लागवडीसाठी उपयुक्त आहे. त्याचं लाकूड टणक आणि सरळ असल्याने घरबांधणी मध्ये त्याचा वापर होऊ शकतो.
मेढशिंगीला हिंदीमध्ये हावर तर शास्त्रीय भाषेत Dolichandrone falcata (Wall. ex DC.) Seem. असं म्हणतात. या वृक्षाचा समावेश Bignoniaceae (बिग्नोनियेसी) या कुळात केलेला आहे.


Plant Profile:

Botanical Name: Dolichandrone falcata (Wall. ex DC.) Seem.
Synonyms: Bignonia falcata, Bignonia spathocea, Dolichandrone lawii, Spathodea falcata
Common Name: Medhshingi
Marathi Name: मेढशिंगी, भेडशिंगी
Family: Bignoniaceae
Habit: Tree
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, Grasslands (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: White (पांढरा)
Leaves: Compound, 4-6 inches long, leaflets elliptic, round or obovate, 2-3 cm long, 5-6 leaflets.
Smell: Fragrant
Abundance: Common
Locality: Dattagad, Dighi, Pune
Flowering Season: April-May
Date Captured: 12-Apr-2017


- रा.जा. डोंगरे